पुणे - राज्य सरकारने नुकतीच जिल्हाबंदी उठवली असून लोणावळा शहरात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, कोरोनाचा पार्श्वभूमीवर शहरात दाखल झालेल्या पर्यटकांनी तसेच नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्याने लोणावळा पोलिसांनी एकाच दिवसात 2 लाख 2 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मास्क न घालणे, सोशल डिस्टसिंग न पाळणे, पर्यटन बंदीचे उल्लंघन, अशा एकूण 405 जणांवर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली.
लोणावळा शहरात पर्यटनबंदी असून या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 8 जणांवर कारवाई करण्यात आली. तर, मास्क न घालणाऱ्या 286 आणि सोशल डिस्टसिंग न पाळणाऱ्या 119 अशा एकूण 405 जणांवर लोणावळा पोलिसांनी बेधडक कारवाई केली. त्यांच्याकडून 2 लाख 2 हजार एवढा दंड वसूल केला आहे. तसेच, वाहतुकीसंदर्भातील नियम तोडणाऱ्या 58 जणांवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच साडेतेरा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्याबंदी उठल्यानंतर लोणावळा पोलिसांना आणखी सतर्क राहावे लागत आहे. लोणावळा शहरात पर्यटनबंदी असून करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करून पर्यटकांनी गर्दी करू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली.