पुणे - महाराष्ट्रातील सर्वात मोठे तुरुंग म्हणून ओळख असलेले पुण्यातील येरवडा तुरुंग पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राज्य सरकारने आता येरवडा तुरुंगात 'तुरुंग पर्यटन' अशी संकल्पना मांडत 26 जानेवारीपासून या उपक्रमाला सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सकाळी 'तुरुंग पर्यटन' या संकल्पनेचे उद्घाटन करणार आहेत.
स्वातंत्र्यपूर्व इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण -
येरवडा तुरुंग हा स्वातंत्र्यपूर्व काळातील विविध घटनांचा साक्षीदार आहे. याठिकाणी राहिलेल्या स्वातंत्र्यसेनानीमुळे येरवडा तुरुंग हा भारताच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण आहे. स्वातंत्र्यानंतरदेखील येरवडा तुरुंग महत्त्वाचा तुरुंग बनून राहिला. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 1975 ते 77 या काळात देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या काळात अनेक जण राजकीय अटकेत होते. या आणीबाणीच्या काळात येरवडा तुरुंगात अनेक मोठ्या राजकीय नेत्यांना बंदी बनवण्यात आले होते. ज्यामध्ये आरएसएसचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस, अटल बिहारी वाजपेयी, प्रमिला दंडवते यांच्यासह अनेक लहान मोठ्या राजकीय नेत्यांना या ठिकाणी बंदी बनवण्यात आले होते. असा इतिहास असलेल्या या कारागृहात मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणात अभिनेता संजय दत्त यानेदेखील शिक्षा भोगली आहे. तसेच अनेक कुख्यात गुन्हेगार दहशतवादी यांना या तुरुंगात डांबण्यात आले होते. 26/11 मुंबई वरील हल्लात फाशीची शिक्षा झालेल्या अजमल कसाबला याच कारागृहात फाशी देण्यात आली होती. तसेच त्याला याच ठिकाणी दफन करण्यात आले होते. असा हा तुरुंग आता 26 जानेवारी पासून सर्वसामान्यांना आतून पाहता येणार आहे.
असा आहे येरवड्याचा इतिहास -
पुणे शहरातील येरवडा तुरुंग राज्यातील सर्वात मोठा, तर आशिया खंडातील मोठ्या मोठ्या तुरुंगांपैकी एक आहे. या तुरुंगात स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वातंत्र्य सैनिकांना ठेवण्यात आले होते. सध्या या तुरुंगात पाच हजार कैदी ठेवता येईल. येवढी या तुरुंगाची क्षमता आहे. इंग्रजांनी 1871 मध्ये हे तुरुंग बांधले होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामासाठी लढणाऱ्या महान स्वातंत्र्य सेनानी पैकी महात्मा, गांधी पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर या स्वातंत्र्यसेनींना येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना इंग्रजांनी बराच काळ येरवडा तुरुंगात ठेवले होते. 1932 पुणे करारा संदर्भात महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात बैठकही याच तुरुंगात झाली होती.
हेही वाचा - मराठी साहित्य संमेलनाचं 'स्वागताध्यक्ष'पद हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान - छगन भुजबळ