पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती आणि जुना पुणे-मुंबई या महामार्गावर शनिवारपासून (१० ऑगस्ट) सहकार ग्लोबल कंपनीकडून टोल वसूल केला जाणार आहे. तर देखभाल आणि दुरुस्तीचे कंत्राट रोड वेज सोल्युशन कंपनीला दिले आहे. या दोन्ही कंपन्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) आणि आयआरबी यांच्यातील टोल वसुलीचा करार संपला आहे. विविध कारणांमुळे आयआरबी कंपनी वादग्रस्त ठरली होती. कंपनीने वसुल केलेल्या टोलची रक्कम ही नोव्हेंबर 2016 मध्येच 2 हजार 869 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. तर करारानुसार एवढीच टोल वसुली करणे आवश्यक असल्याचा दावा करत, टोल वसुली बंद करण्यात यावी, यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात होती. मात्र, त्यावेळी राज्य सरकारने टोल वसुलीचा कालावधी सुरूवातील एप्रिल 2030 आणि नंतर 2036 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
आयआरबीचा करार संपल्याने टोल वसुलीसाठी राज्य सरकारने नव्याने निविदा मागवल्या होत्या. मात्र, तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करत, एमएसआरडीसीने नोव्हेंबरपर्यंत किशोर अग्रवाल व्यवस्थापकीय संचालक असलेल्या सहकार ग्लोबल या नव्या कंपनीला टोल वसुलीचे कंत्राट दिले आहे.