पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीपासून (सोमवारी) दहा दिवसांचे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. आजच्या पहिल्या दिवशी पिंपरी-चिंचवडकरांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच पुढील 9 दिवस असेच सहकार्य नागरिकांनी करावे, असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केले आहे. दरम्यान, नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी कारवाई करत उठाबशा करायला लावल्या, तर काही ठिकाणी लाठ्यांचा प्रसादही देण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेऊन दोन्ही शहरात दहा दिवसाचे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आजपासून शहरात दहा दिवसांच्या लॉकडाऊन असून अत्यावश्यक सेवा वगळून सर्वच दुकाने पूर्णतः बंद असणार आहेत.