पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसमधून नेते जरी भाजप शिवसेनेत जात असले, तरी कार्यकर्ते आमच्या सोबतच आहे. या बाबीचा आम्हाला समाधान असून याच कार्यकर्त्यांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा उभे करू, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे. ते शहरातील पुणा मर्चंट बँकेच्या गुरुवार पेठ शाखेच्या उद्घाटना प्रसंगी आले होते. यावेळी त्यांनी सदरील प्रतिक्रियी दिली.
पक्षातून अनेक जण निवडणुकीच्या तोंडावर भाजप शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. त्यांना वेगवेगळी आश्वासने दिली जातात. मात्र, ज्या प्रकारे लोक भाजप शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि विधानसभेच्या फक्त २८८ जागा आहेत ते पाहता युती झाली तर १४४ जागाच प्रत्येकी त्यांना लढवाव्या लागतील. अशा परिस्थितीमध्ये सैरभैर वातावरण निर्माण होईल. सगळ्यांना सामावून घेणे त्यांना शक्य होणार नाही. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच महाराष्ट्रात वेगळे वातावरण पाहायला मिळेल एवढच आता सांगतो, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
सध्या राष्ट्रीयकृत बँकांच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. सध्याच्या राष्ट्रीयकृत बँकांची संख्या कमी करून देशपातळीवर ६ बँकाच ठेवायचे अशी चर्चा सुरू आहे. यापूर्वी असा प्रयत्न झाला होता. त्यामुळे यातून काय पुढे परिस्थिती निर्माण होईल हे काळच ठरवेल, असे देखील अजित पवार म्हणाले. जीडीपी बाबत बोलताना गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जीडीपीमध्ये मोठी घसरण झाली आहे. देशपातळीवर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कंपन्यांमध्ये कामगार कपात होत असल्याने त्याचे दुरगामी परिणाम होतील. महागाई प्रचंड वाढत आहे त्यात आरबीआयकडे असलेले राखीव निधी सरकारने काढून घेतले त्यामुळे देशाच्या आर्थिक घडीचा डोलारा सावरला जाईल याची काहीही खात्री देता येत नाही. त्याचबरोबर, महाराष्ट्रासमोर सध्या मोठे संकट उभे असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग धंद्यांसमोर अनेक अडचणी आहेत. या परिस्थितीचा काय फटका बसेल हे येणारा काळच सांगेल, असे अजित पवार यावेळी म्हणाले.