पुणे - पुणे-अहमदनगर मार्गावर रांजणगाव गणपती जवळ दुचाकीवरून जाणाऱ्या प्रवाशाला मारहाण करून लुबाडणाऱ्या दोन चोरट्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. शरद उर्फ सदानंद गंगाधर जवक (वय 29) आणि श्रीकांत दत्तात्रय सरोदे (वय 22), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबर रोजी श्रीगोंदा तालुक्यातील अमित खराडे हे दिवाळीची सुट्टी संपून पुण्याला जात असताना अज्ञात चोरट्यांनी रांजणगाव गणपती जवळ त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर 'तू माझ्या अंगावर का थुंकला' असे म्हणत त्यांना बेदम मारहाण केली. चोरट्यांनी त्यांची दुचाकी, रोख रक्कम आणि मोबाईलही चोरून नेला होता. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरवात केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासादरम्यान तांत्रिक बाबी तपासल्या असता गुन्ह्यात दोन आरोपींचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. गुप्त माहितीतून हे दोन्ही आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील रांजणगाव मशीद येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने रांजणगाव मशीद येथून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यात चोरलेला मोबाईल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.
हेही वाचा - 'कोरोना नको रे बाबा.. कोरोनाचा अनुभव मी घेतलाय, फार भयानक काम आहे'