पुणे : 'पुणे तिथे काय उणे' असे नेहेमीच म्हटले जाते. याची प्रचिती ही आपल्याला अनेकदा विविध माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत आपण मोबाईल, दागिने व सोने - चांदीच्या चोरी तसेच घरफोडीच्या घटना पाहिल्या असतील, मात्र आता पुण्यातील खडकी परिसरातून चक्क 30 ते 40 हजार रुपयांच्या चपला चोरीला गेल्या आहेत. या चप्पल चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सागर दत्ता चांदणे, (वय 23 वर्षे), रा. महादेववाडी, खडकी, आकाश विक्रम कपुर, (वय 22 वर्षे), रा. खडकी, अरबाज जाफर शेख, वय 21 वर्षे, रा. खडकी यांना अटक केली असून हरेश श्रीचंद अहुजा, (वय 38 वर्षे), यांनी घटनेची फिर्याद दिली होती.
55 चपलांचे बूट चोरून नेले : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील खडकी भागातील एका दुकानातून तब्बल 55 चपला आणि बूटांचे जोड चोरट्यांनी चोरून नेले. या चपलांची किंमत जवळपास 30 ते 40 हजार रुपये एवढी होती. यामध्ये 40 मेन्स शूज तर 15 लेडीज चपला चोरट्यांनी चोरल्या होत्या. हरेश आहूजा यांचे पुण्यातील खडकी बाजार परिसरात चपलेचे गोडाऊन आहे. शनिवारी गोडाऊन बंद केल्यानंतर रात्री या तीन तरुणांनी गोडाऊनचे शटर फोडून आत प्रवेश केला. ते बूट आणि चपलांचे एकूण 55 जोड चोरी करून पसार झाले.
सीसीटीव्हीद्वारे चोरांना पकडले : हे तरुण अशिक्षित असून उदरनिर्वाह तसेच दारू पिण्यासाठी त्यांनी ही चोरी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. खडकी पोलिस ठाण्यात या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे म्हणाले की, जेव्हा आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली तेव्हा जवळपास 15 ते 20 सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी करण्यात आली. त्यावरून आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. आता या आरोपींवर अजूनही काही गुन्हे दाखल आहेत का याचा देखील तपास करण्यात येणार आहे.
हेही वाचा :
- Online Betting On Cricket : आयटी हब हिंजवडीमध्ये क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन बेटिंग; नऊ जणांना अटक
- Betting On IPL Cricket Match : क्रिकेट सट्टेबाजीप्रकरणी तिघांना अटक, पाच जणांवर गुन्हा दाखल
- Pune Crime News: पुण्यात वेश्याव्यवसायाचे वाढते सत्र; पिंपरी-चिंचवडमध्ये स्पाच्या नावाखाली चालत होता वेश्याव्यवसाय, दलालास पोलिसांनी ठोकल्या बेड्या