पुणे - पिंपरी चिंचवड शहरात वाहनांची तोडफोड आणि एटीएम मशीन फोडण्याच्या घटना काही नवीन नाहीत. अशातच आर.बी.एल बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने कापून 12 लाख 84 हजार रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या म्हाळूगे येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे.
शहरातील बहुतांश एटीएम हे सुरक्षा रक्षका विना असल्याचे पाहायला मिळत आहे. रहाटणी येथे लिंक रोडवर आरबीएल बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून त्यातील लाखो रुपये लंपास केले आहेत. हा प्रकार आज बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी परिसरात लिंक रोडवर आरबीएल बँकेचे एटीएम आहे. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम कापून १२ लाख रुपये लंपास केले आहेत. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानुसार तीन चोरट्यांचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.
दुसरीकडे चाकण मधील म्हाळुंगे येथे देखील एटीएम लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, तो प्रयत्न फसला आहे, असे पोलिसांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहरात 2 आठवड्यांपूर्वी वाकड परिसरात एक एटीएम फोडल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये गॅस कटरने एटीएम फोडताना एटीएममधील लाखो रुपये जळून खाक झाले होते.
हेही वाचा - चोरीच्या गाड्या आणायला विमानाने जाणारा चोरटा अटक, 2 कोटीच्या मोटारी जप्त