पुणे - पाणी पुरवठयामध्ये जून अखेरपर्यंत कोणतीही कपात करण्यात येणार नाही. वेळप्रसंगी धरणातील मृत पाणीसाठा वापरण्यात येईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. पुणेकरांनीही पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन बापट यांनी केले. पाणी पुरवठा आणि दुष्काळासंबंधी घेतलेल्या आढावा बैठकीत बापट बोलत होते.
पुणे जिल्ह्यातील काही भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या मदतीने दुष्काळ निवारणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. शहरात ज्या ठिकाणी पाईपलाईनचे काम करणे आवश्यक आहे, अशा ठिकाणची कामे तत्काळ करण्यात येणार आहेत. पाण्याच्या कामासाठी आचारसंहितेची अडचण येणार नाही. शहराला पाणी पुरवठा करणार्या धरणामध्ये सध्या जून महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सध्या जेवढे पाणी शहराला देण्यात येत आहे. यामध्ये कोणतीच कपात करण्यात येणार नाही, अशी माहिती गिरीश बापट यांनी दिली.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक जनावरांना चारा छावण्यांमध्ये ठेवण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे पुणे शहरामध्ये असणारी पाण्याची उपलब्धता आणि जागा पाहून चारा छावण्या लावण्यात येणार आहेत. याठिकाणी दुष्काळ भागातील जनावरे आणण्यात येतील. यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकातील निधी वापरण्यात येईल, असेही बापट यांनी स्पष्ट केले. शहराला पाणीपुरवठा करणार्या धरणामध्ये ५.९२ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्याच्या नियोजनासादर्भात आढावा घेण्यात आला.