पुणे - निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी राजकीय नेते काय करतील याचा नेम नाही. असाच एक प्रकार पुणे-नाशिक महामार्गावर असणाऱ्या राजगुरुनगर येथे पाहायला मिळाला. शिरूर मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला आहे. शिवनेरी ते तुळापूरदरम्यान निघालेल्या विजयी निर्धार यात्रेत हा प्रकार पाहायला मिळाला. या रुग्णवाहिकेत वाद्यांच्या तालावर गाणीही सुरू होती.
अपघातासारख्या संकटात मानवाला आधार देते ती रुग्णवाहिका आता निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी वापरली जात आहे. आढळराव पाटलांची विजयाची निर्धार यात्रा सुरू असताना पुणे-नाशिक महामार्गावरून मोठ्या संख्येने वाहने तुळापूरच्या दिशेने निघाली होती. या ताफ्यामध्ये एक मुख्य आकर्षण ठरली ती ही रुग्णवाहिका. या रुग्णवाहिकेत वेगवेगळ्या पद्धतीची वाद्य वाजवत शिवसेना खासदारांचा प्रचार सुरू असल्याचे दिसून आले. ही रुग्णवाहिका खासदार आढळराव पाटील यांच्या प्रचारात साथ देत आहे. त्यामुळे ही रुग्णवाहिका तिची जबाबदारी विसरली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.