मुंबई - 26 नोव्हेंबर 2008 मुंबई आणि संपूर्ण देशवासीयांसाठी काळा दिवस आहे. याच दिवशी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता. आज या दहशतवादी हल्ल्याला 16 वर्ष झालीत. मात्र, 16 वर्षांनंतर देखील या काळ्या दिवसाच्या आठवणी आणि जखमा आजही मुंबईकरांच्या मनात भीतीचे घर करून आहेत. या हल्ल्यात 18 पोलीस आणि सैन्य दलातील जवान हुतात्मा झाले होते. तर 166 लोक मारले गेले असून, 300 हून अधिक लोक जखमी झाले होते.
बोटीतून उतरलेल्या लोकांकडे मोठ्या जड बॅगा : खरंतर त्यावेळी 10 दहशतवादी पाकिस्तानातील कराची येथून बोटीने मुंबईत येण्यासाठी रवाना झाले होते. तसेच ते सर्व समुद्रमार्गे मुंबईत दाखलसुद्धा झाले. भारतीय नौदलाच्या निदर्शनास येऊ नये, यासाठी त्यांनी एका भारतीय मच्छीमार बोटीवर कब्जा केला. या दहशतवाद्यांनी त्या मच्छीमार बोटीतील सर्व लोकांना ठार केले. या बोटीतून ते रात्री आठच्या सुमारास मुंबईतील कुलाबा येथील धक्क्यावर पोहोचले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी बधवार पार्क धक्क्यावर आले त्या दिवशी भारत आणि इंग्लंड क्रिकेट सामना सुरू होता. त्या दिवशी अमावस्यादेखील होती. त्यामुळे सर्व स्थानिक मच्छीमार क्रिकेटचा सामना पाहण्यात व्यस्त होते. इतर वेळी नेहमी या धक्क्यावर साधारण 30 ते 40 लोक गप्पा मारत बसलेले असतात. मात्र, त्या दिवशी भारत-इंग्लंड मॅच असल्याने सर्व आपापल्या घरात क्रिकेटचा सामना पाहत होते. तीन ते चार लोकच त्यादिवशी धक्क्यावर बसले होते. त्यांनी बोटीतून उतरलेल्या लोकांकडे मोठ्या जड बॅगा पाहिल्याने त्यांना प्रश्न विचारले. स्थानिकाच्या या प्रश्नावर कसाब आणि त्याचे साथीदार लगेचच टॅक्सी पकडून टार्गेटच्या दिशेने रवाना झाले.
पोलिसांच्या गाडीमधून जोरात फायरिंग : या दहशतवाद्यांनी मेट्रो सिनेमा येथील कामा हॉस्पिटलमध्येदेखील हल्ला केला, या हल्ल्याचे वार्तांकन करताना 'ईटीव्ही भारत'चे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल निर्मळ हेदेखील जखमी झाले होते. या दिवसाच्या आठवणी ताज्या करताना अनिल निर्मळ सांगतात की, "कामा रुग्णालयात हल्ला झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्याचे वार्तांकन करण्यासाठी आम्ही मेट्रो सिनेमा चौकात पोहोचलो. डिव्हायडरचा आडोसा घेऊन आम्ही तिथल्या सर्व घटनांचे छायाचित्रण करत होतो. तेवढ्यात समोरून एक पोलिसांची गाडी आली. आम्हाला वाटलं पोलीस अधिकारी आलेत. त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही सर्व उभे राहिलो. तेवढ्यात पोलिसांच्या गाडीमधून जोरात फायरिंग करण्यास सुरुवात झाली. त्यावेळी लक्षात आलं त्या गाडीत पोलीस नसून दहशतवादी आहेत. त्यांची एक गोळी माझ्या बोटालादेखील लागली. सहा महिने त्यावर उपचार सुरू होते."
दहशतवादी हल्ल्याला 16 वर्षे पूर्ण : आज या दहशतवादी हल्ल्याला 16 वर्षे पूर्ण झाली असून, मुंबईत ज्या ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले केले, त्या त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याचं दिसून येतंय. आजघडीला बधवार पार्क येथील कफ परेड पोलीस ठाणे अंतर्गत एक पोलीस चौकी तयार करण्यात आली असून, येथे पोलीस तैनात असतात. तर, हॉटेल ताज येथेदेखील पोलिसांची एक टीम सतत तैनात असते. बाजूलाच असलेल्या गेटवे ऑफ इंडिया येथे पोलिसांच्या क्विक रिएक्शन टीम म्हणजेच क्यूआरटीची एक टीमदेखील तैनात असते. लिओपोर्ड कॅफे येथे देखील सुरक्षारक्षकांचा बंदोबस्त पाहायला मिळालाय. तर हॉटेल ओबेराय येथेदेखील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाणे अंतर्गत सुरक्षा दिली जाते. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सध्या मेटल डिटेक्टर बसवण्यात आले असून, इथे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच आरपीएफ, जीआरपी म्हणजेच लोहमार्ग पोलीस आणि होमगार्ड अशा तिन्ही दलांचे सुरक्षा देण्यात आलीय. या हल्ल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात मेटल डिटेक्टर बसवण्यात आले. आज घडीला यातील काही मेटल डिटेक्टर सुरू असून, काही मेटल डिटेक्टर नादुरुस्त अवस्थेत असल्याचे दिसून येतं.
हेही वाचा