पुणे- शहरातील दहा हजार इमारतींचं जीपीएस मॅपिंग करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सहा सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला महापालिकेतील विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी चक्क महापालिका विकणे आहे, अशा प्रकारची दवंडी पिटत या सल्लागार नेमण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे.
महापालिकेमध्ये प्रशासनाकडून मोठ्या पगाराचे, मोठ्या पदाचे अधिकारी असताना बाहेरून सल्लागार नेमण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित करत या नेमणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे. शहरातील या दहा हजार इमारतींचं जीपीएस मॅपिंग करण्यासाठी सहा सल्लागार नेमण्यात येणार असून प्रत्येक सल्लागाराला महिन्याला 3 लाख 24 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. एक वर्षाचा हा करार असल्याने कोट्यवधी रुपयांचा पुणेकर जनतेचा पैसा उडवला जाणार असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
मुळातच महापालिकेने यापूर्वीच संगणीकरण करत असताना शहरातील इमारतींचे जीपीएस मॅपिंग पूर्ण केलेले आहे. तेव्हा पुन्हा सल्लागार नेमण्याची आवश्यकता काय होती, असा सवाल उपस्थित करत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची ही मिलीभगत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने निषेध व्यक्त केला आहे.