पुणे - तब्बल २ लाख १९ हजार रुपयांचे मोबाईल हस्तगत करत हिंजवडी पोलिसांनी परराज्यातील गुन्हेगार टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांना २२ मोबाईल त्यांच्याकडे मिळाले आहेत. अनारूल, साबीर, अस्माउल, इलियास, अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिमालया मोबाईल शॉपीवर संबंधित आरोपींनी दरोडा घातला होता. याप्रकरणी, त्यांचा कसून तपास सुरू होता. दरम्यान, हिमालया या मोबाईल शॉपीमधील एक मोबाईल सुरू झाल्याने तांत्रिक बाबीतून आरोपी मोहम्मद रफिक आलम याचे नाव पुढे आले. पोलिसांच्या तपासात तो मुंबईत असल्याचे समोर आले. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी पत्ता शोधून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याला हा मोबाईल कुठून घेतला विचारले असता आंबेगाव खुर्द येथील मित्र अनारूल ईनाबूल हक (वय-२०) याच्याकडून घेतल्याचे सांगितले.
त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने माहिती दिली आणि संबंधित मोबाईल शॉपी फोडल्याचे कबूल केले. दरम्यान अनारूल हकने घरी ठेवलेले काही मोबाईलही हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक गायकवाड, कुणाल शिंदे, सुभाष गुरव, हनुमंत कुंभार यांनी केला.