पुणे - जिल्ह्यातील पूर्व आंबेगाव तालुक्यात भागडी येथील अल्पशिक्षित गोपाळ गवारी यांनी तब्बल 12 एकरवर शुगरकिंग जातीची कलिंगड शेती फुलवली आहे. डोंगरालाही घाम फोडून सायफन पद्धतीने पाण्याचे सिंचन करत हा शेतकरी शेती करत आहे.
हा डोंगराळ पट्यातील आणि कमी पर्जन्यमान असलेला भाग वर्षानुवर्षे पडीक आहे. सातगावपठार म्हणून ओळख असणाऱया या भागडी गावात गोपाळ गवारी यांची वडिलोपार्जित ३५ एकर जमीन आहे. ही जमीन एकेकाळी ओबडधोबड होती. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या जमिनीत कोणतही पीक इथे घेतले जात नव्हते. मात्र गोपाळ गवारी यांनी इथे पाणी पोहचण्यासाठी जवळच्याच दुसऱ्या डोंगरापाशी दिड कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले आहेत. या शेततळ्यात घोडनदीवरून पाच किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन द्वारे पाणी आणले जाते आणि शेततळ्यात सोडले जाते. या शेततळ्यातून सायफन पद्धतीने एका डोंगरावरून दुस-या डोंगराच्या पायथ्याशी सिंचन केले जात आहे.
गवारी आपल्या शेतात दरवर्षी कलिंगडाची लागवड करतात. यंदाही त्यांनी १२ एकर क्षेत्रावर कलिंगडाची टप्याटप्याने लागवड केली आहे. यासाठी ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर केला आहे. यंदाही कलिंगडाची शेती बहरात आली आहे. त्यामध्ये २ ते ५ किलो वजनाची कलिंगडे झाडाला लागली आहेत. एकरी २४ ते २५ टन सरासरी उत्पन्न मिळाले आहे. शेताच्या बांधावर येऊन व्यापारी कलिंगडाची खरेदी करत आहेत. सुरूवातीच्या काळात गवारी उत्पादित झालेला माल मुंबई आणि पुणे मार्केटला विक्री करत होते. मात्र नंतरच्या काळात गवारी यांच्या फळांना जागेवर मागणी येऊ लागली आहे.
या संपूर्ण कामात गोपाळ गवारी यांचा कृषी पदवीधर मुलगा राम आणि पत्नी कांताबाई यांचा मोलाचा वाटा आहे. जमीन सपाट केल्यानंतर पाण्याची सोय केल्यापासून त्यांनी उसासारख्या पिकाची कधीही लागवड केली नाही. ते वर्षभर पालेभाज्या आणि फळभाज्यांसारखी नगदी पीक लागवड करत आहेत. यामुळे परिसरातील १२ कुटंबातील ३५ मजुरांना वर्षभर रोजगार मिळायला लागला आहे. भागडी गाव एकेकाळी दुष्काळी गाव म्हणून ओळखले जात होते. गावातील ७० टक्के जमीन पडीक होती. अलीकडे आदर्शगाव योजनेच्या माध्यमातून येथे शिवारात पाणी अडवण्याची कामही झाली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी शिवारात अडवण्यास मदत होत आहे. गवारी सारखे शेतकरी याच गोष्टीचा विचार करून शेती फुलवत आहे.