बारामती: कार अपघातात (Car Accident) बारामतीतील सराफ व्यावसायिक श्रेणिक भंडारी यांची पत्नी अश्विनी भंडारी, मुलगा मिलिंद भंडारी व बहिण आणि बारामतीतील व्यापारी उदय कळसकर यांची पत्नी कविता कळसकर यांचा मृत्यू झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी असून त्यांना पुण्याला हलविण्यात आले आहे.
एका धार्मिक कार्यक्रमासाठी हे सर्व जण पुण्याला गेले होते. रात्री कार्यक्रम संपवून बारामतीला निघालेले असताना तरडोलीपासून पुढे आल्यानंतर उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने मागून गाडी धडकून हा अपघात झाल्याचे सकृत दर्शनी समोर आले आहे. गाडीची धडक जोरदार होती, त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.या अपघाताने भंडारी व कळसकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. अत्यंत धार्मिक स्वभावाच्या म्हणून अश्विनी भंडारी व कविता कळसकर यांची ओळख होती. तर मिलिंद भंडारी हेही मितभाषी व संयमी स्वभावाचे होते. रात्री अपघाताची माहिती मिळताच बारामतीतील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.अपघाताची तीव्रता पाहून अनेक जण हळहळले.