बारामती - बारामती तालुका पोलिसांनी दमदार कामगिरी करत विविध गुन्ह्यात पाहिजे असलेल्या फरार आरोपीला नाशिक येथून अटक केली. मागील दोन वर्षांपासून बाळ्या दराडे हा पोलिसांना गुंगारा देत फरार होता. दराडे यांने युवकांना गुन्हेगारी क्षेत्रात ओढून आपले साम्राज्य निर्माण केले होते. बारामती, एमआयडीसी तसेच भिगवन व इंदापूर परिसरात त्याने मोठी दहशत माजवली होती. त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती.
होते ५० हजार रुपयांचे बक्षीस
पुणे जिल्ह्यातील बारामती इंदापूर तालुक्यातील परिसरात दराडे याने दहशत माजवली होती. दराडेची माहिती देणाऱ्यास ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याच्यावर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अखेर बारामती तालुका पोलिसांनी त्याला नाशिक येथून ताब्यात घेतले.
महाराष्ट्रासह अन्य राज्यात गंभीर गुन्हे दाखल
कुख्यात गुंड बाळ्या दराडे याच्यावर बारामती तालुका, बारामती शहर, भिगवन, वालचंदनगर, सातारा, फलटण, कराड पोलीस ठाण्यासह गुजरात राज्यात मोक्का, खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्याच्या मागावर संपूर्ण पुणे ग्रामीण पोलीस व सातारा पोलीस होते. मात्र तो राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यात लपून मागील दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
यांनी केली कारवाई
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहा पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार दादा ठोंबरे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद लोखंडे, नंदू जाधव, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, रंजीत मुळीक, अमोल नरुटे यांनी केली.