खेड/पुणे - संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आहे. या व्हायरसविरुद्ध कोरोना योद्धे नेटाने लढा देत आहेत. जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स हे रुग्णांची सेवा करत आहेत. जगभरात आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जात आहे. फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी आधुनिक नर्सिंगचा पाया रचला. आज त्यांची जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव लसीकरण केंद्रावर परिचारिका दिनाचे औचित्य साधत प्राथमिक शाळेतील तसेच खासगी शाळेतील शिक्षक हे परिचारिकांच्या मदतीला धावून आले आहेत.
हेही वाचा - 'कोरोना संकटात केंद्र व राज्यांनी काहीही लपवू नये'
शेलपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिकांचा कामाचा ताण कमी करण्यासाठी शिक्षक, आशा स्वयंसेविका, आशा सुपरवायझर व ग्रामस्थ यांनी कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढवण्यासाठी लसीकरणासाठी टाळ्या वाजवून स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत शेलपिंपळगाव व नागरिकांच्यावतीने त्यांना गुलाबाची फुले देऊन सत्कार करण्यात आला. या घटनेने शेलपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिकांच्या भावनांना बांध फुटला. आमचे अशाप्रकारे आगळेवेगळे स्वागत केल्यामुळे आम्ही करत असलेल्या कामाचे नक्कीच समाधान होत असल्याच्या भावना यावेळी येथील परिचारिकांनी व्यक्त केल्या आहेत. यावेळी 45 पेक्षा जास्त दिवस झालेल्या नागरिकांना दुसरा डोस दिला जात आहे.
कोरोनाच्या काळात परिचारिकांचे असलेल्या योगदानामुळे त्यांना यापासून आणखी उत्साह निर्माण व्हावा म्हणून हा दिन ग्रामस्थांच्यावतीने साजरा करण्यात आला.
हेही वाचा - 'कोरोना रोखण्यात अपयशी झाल्याने पंतप्रधान मोदींनी जनतेची माफी मागावी'