पुणे - तौक्ते चक्रीवादळाचा फटका पुणे शहरालाही बसत असून शहरात वादळी वारा व पावसामुळे शहराच्या विविध भागात झाडे पडण्याच्या 31 घटना घडल्या आहेत. शनिवारी रात्री 9 ते रविवारी दुपारी 4 वाजेपर्यंत अग्निशामक दलाकडे झाडे पडण्याच्या एकूण 31 घटनांची नोंद झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
पुण्यात शनिवारी रात्रीपासूनच तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम दिसू लागला. शनिवारी रात्रीही जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. आज (रविवारी) दुपारपासून जोरदार वारे वाहत आहेत. शहरातील कोंढवा, कोथरूड, मुंढवा, हडपसर, कल्याणीनगर, सेनापती बापट रोड, सिंहगड रस्ता यासह शहरातील 32 ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे.