पुणे - माझ्यासारख्या दलित माणसाला काँग्रेसने जवळ केले. सोनिया गांधींनी मला देशाच्या गृहमंत्रीपदी बसवले, दुसऱ्या पक्षात गेलो असतो तर इतके सगळे मिळाले नसते. येथून तिकडे खूप गेले पण त्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे मी चुकीच्या पक्षात नाही, असे सांगत माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना चिमटा काढला.
कारगिल दिनाचे औचित्य साधत पुण्यातील सरहद संस्थेच्यावतीने माजी उपलष्कर प्रमुख लेफ्ट. जनरल (निवृत्त) मोती धर आणि लेफ्ट. जनरल (निवृत्त) रवी दास्ताने यांचा कारगिल गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सर्जिकल स्ट्राईक नेतृत्व केलेले लेफ्ट जनरल (निवृत्त) डी एस हुडा, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, राकेश भान आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सुरवातीला बोलताना विक्रम गोखले म्हणाले, सुशीलकुमार शिंदे चांगले राजकारणी आहेत. पण, ते चुकीच्या पक्षात आहेत. आज ते दुसऱ्या पक्षात राहिले असते तर कुठच्या कुठे राहिले असते .त्यावर उत्तर देताना सुशीलकुमार शिंदे बोलत होते.
शिंदे म्हणाले, मी योग्य पक्षात आहे. माझ्यासारख्या कोर्टात साधा कारकून असणाऱ्या माणसाला काँग्रेसने खूप काही दिले आहे, जर मी दुसऱ्या पक्षात गेलो असतो तर इतकं सार मिळाले नसते. आता ते ज्या पक्षात गेले त्यांना चूप बसावं लागत असल्याचे ते म्हणाले.