पुणे - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना राजधानी दिल्लीत दंगल होणे हे धक्कादायक आहे. देशाच्या गृहमंत्र्यांना देशाच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे जमत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष आपल्या देशाच्या दौऱ्यावर असताना राजधानीमध्येच हिंसाचार होतो, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गृहमंत्रालय आणि गुप्तहेर खात्याचे हे अपयश आहे. दिल्लीतील हिंसाचाराची लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे, असेही सुळे म्हणाल्या.
हेही वाचा - दिल्ली हिंसाचार : दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश, डोवाल यांनी घेतला आढावा
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशीही हिंसाचार सुरू आहे. यात आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 170 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे आहेत. दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. हिंसाचारग्रस्त भागात गोंधळ घालणाऱ्यांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.