पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी सीएमई गेट परिसरात ठेकेदार पगार देत नसल्याने सुपरवायझरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. रवींद्र प्रताप सिंग (वय 45 वर्षे), असे आत्महत्या केलेल्या सुपरवायझरचे नाव आहे. त्यांनी गुरुवारी (दि. 9 जुलै) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल्याचे भोसरी पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, रवींद्र यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली असून यात ठेकेदार पगार देत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली आहे. तसेच संबंधित ठेकेदाराकडून पगाराचे पैसे घेऊन माझ्या कुटुंबाला द्यावेत, असेही त्या चिठ्ठीत लिहिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रविंद्र सिंग हे सीएमई गेट दापोडी येथे सुरु असलेल्या बांधकाम साईटवर सुपरवायझर म्हणून काम करीत होते. त्यांनी गुरुवारी सायंकाळी राहत असलेल्या पत्रा शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनस्थावर एक चिठ्ठी मिळाली आहे. यामध्ये ठेकेदाराने पगार न दिल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. रवींद्र यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - पुण्यात कोरोनाबाधित महिलेचे रुग्णालयातून पलायन; दीड तासाच्या प्रयत्नानंतर पकडण्यात यश