पुणे - जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुक येथील ऊसाच्या शेतीला आग लागली. यामध्ये संपूर्ण ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे ४ शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुक येथे विकास बिबवे, शरद बिबवे, भारत भोर यांच्यासह आणखी एका शेतकऱ्याच्या शेतातील उस काढणीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास शेतीवरून गेलेल्या विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये घर्षण होऊन ऊसाच्या शेतीला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. यामध्ये चार एकर ऊस जळून खाक झाला.
ऊसाच्या शेतीला जंगल समजून अनेक जंगली प्राणी ऊसाच्या शेतीत आश्रय घेतात. अचानक लागलेल्या अशा आगीमुळे या जंगली प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र, याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.