पुणे - महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पावसाने थैमान घातल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच सांगली, कोल्हापूर येथे पुराने वेढा घातला आहे. सुभाष देशमुख यांच्याकडे पालकत्व असलेल्या सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळ येथे बोट उलटून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु, देशमुख हे सांगलीचा आढावा घेणे गरजेचे असताना त्यांनी चक्क भाजप शहर कार्यालयात हजेरी लावून भाषण ठोकले. पुरग्रस्तांना मदत करण्याऐवजी देशमुख यांना पक्ष महत्वाचा आहे का, असा सवाल आता नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
कोल्हापूर, सांगलीसह मिरजेला महापुराने थैमान घातले आहे. एनडीआरएफ, सैन्य दल तसेच स्थानिकांकडून पुरात अडकलेल्यांना मदतीचा हात दिला जात आहे. मात्र, मंत्री देशमुख हे पक्षकार्यात व्यस्त आहेत. यातून सरकारचे असंवेदनशीलतेचे दर्शन होत आहे.
भाजप कार्यालयाबाहेर पडल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत देशमुख म्हणाले, मी ५ ऑगस्ट रोजी पुरस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा दौरा करून माहिती घेतली असून जिल्ह्याधिकाऱ्यांच्या मागणीनुसार मदत पुरविली आहे. आपत्ती व्यवस्थापनेच्या विभागी कार्यालयाला भेट देण्यासाठी आलो होतो. पक्षाचे काम असल्याने जाता जाता भेट दिली, असे म्हणत देशमुख यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.