पुणे - विविध मागण्यांसाठी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोर आंदोलन सुरू केले. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरावरील अनेक मागण्या आहेत. मात्र, या मागण्यांकडे महाविद्यालय प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. तसेच मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत धरणे कायम ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
हेही वाचा - विवाह सोहळ्याला देशभक्तीचा रंग; पुण्यात अनोखा उपक्रम
विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या प्रशासनाची त्वरित बदली करावी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे 1250 रुपये त्वरित परत करावे, विद्यार्थ्यांची स्टायपेंड त्वरित द्यावी, ग्रंथालय 24 तास सुरू करून कायमस्वरूपी ग्रंथपाल नियुक्त करावा, मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करावे, महाविद्यालयाचे मैदान इतर कोणालाही भाडेतत्वावर देऊ नयेत, उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई करू नये, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.
या प्रकरणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आमच्याशी संवाद करणे गरजेचे आहे. आमच्याशी चर्चा केल्यास मागण्या त्वरित मान्य करण्याचे आश्वासन महाविद्यालयाने दिले आहे.
शैक्षणिक सहलीचे काही विद्यार्थ्यांना पैसे मिळाले आहेत. स्टेट बँकेत खाते असलेल्या विद्यार्थ्यांना पैसे मिळाले आहेत. मात्र, इतर बँकेत खाते असलेल्या विद्यार्थ्याचे पैसे राहिले असून ते लवकरच मिळतील. तर ग्रंथपालाची जागा रिकामी असून ती लवकरच भरण्यात येईल. तर सीसीटीव्ही त्यांच्या सुरक्षेसाठी असून मुलांसाठी हे मैदान आहे. मात्र, ते रिकामे असेल तरच भाड्याने दिले जाते, असे प्रशासनाने सांगितले आहे.
हेही वाचा - पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची' स्थापना