पुणे - विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी एका थाळीत दोघांनी जेवण करू नये, असा नियम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफॅक्टरीने नुकतेच एक परिपत्रक काढले. विद्यापठानेही या नियमांचे पालन करण्यात यावे असा आदेशही काढला. त्यानंतर या नियमविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले असून त्याविरोधात रिफेक्ट्रीसमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
मागील काही दिवसांपासून पुणे विद्यापीठातील रिफॅक्टरीबाबत विद्यार्थी सातत्याने तक्रारी करत आहेत. यापूर्वी दोन ते तीन वेळेस विद्यार्थ्यांच्या जेवणात आळ्या आढळल्या होत्या. तेव्हाही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. आताही विद्यापीठ प्रशासनाने एक परिपत्रक काढले असून त्यात अनेक अटी आणि नियम घातले आहेत. एका थाळीत दोन विद्यार्थ्यांनी जेवण करू नये, असा नियम या परिपत्रकात घालून दिला आहे. प्रत्यक्षात काही विद्यार्थ्यांना एक थाळी संपत नाही तर काही विद्यार्थी गरीब असल्याने एक थाळी दोघात खातात. परंतु एका थाळीत एकानेच जेवावे, असा नियम विद्यापीठाने घालून दिला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आक्रमक रूप धारण करत रिफेक्टरीजवळ आंदोलन केले.