पुणे : आ. रोहित पवार म्हणाले की, 'सिस्टर सिटी' मोहिमेअंतर्गत पुणे शहराने अमेरिकेतील सॅन होजे शहराला दिलेला आणि तेथील उद्यानात बसवण्यात आलेल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली चोरी संतापजनक आहे. हा आपल्या आणि तेथील मराठी जनतेच्या भावनेचा विषय आहे. यासोबतच त्यांनी राज्य सरकारला या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती देखील केली आहे. छत्रपतींचा पुतळा चोरी झाल्याबाबत लवकर तपास करून दोषींवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी राज्य सरकारने भारतीय परराष्ट्र खात्याकडे करावी, अशी विनंती रोहित पवारांनी यांनी ट्विटद्वारे केली आहे.
चोरट्यांचा तपास सुरु : उत्तर अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता. सॅन होसे येथील Guadalupe River Park या उद्यानामध्ये हा अश्वारुढ पुतळा होता. या चोरीनंतर सॅन जोसच्या उद्यान विभागाने ट्विट करून हा पुतळा चोरी झाल्याची माहिती दिली आहे. त्यांचे पडसाद महाराष्ट्रात देखील पाहायला मिळत आहेत. उद्यानातील हा पुतळा चोरी झाल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा तपास सुरु केला असून; पोलिसांनी स्थानिक नागरिकांचे सहकार्य देखील मागितले आहे.
भेट म्हणून दिला पुतळा : पुणे शहराकडून अमेरीकेतील सॅन जोसे शहराला हा पुतळा भेट म्हणून दिला होता. सॅन जोसे शहराला पुण्याची सिस्टर सिटी म्हणून हा पुतळा देण्यात आला होता. या दोन्ही शहरांमधील अनेक बाबतीत साधर्म्य असून दोन्ही शहरांना समुद्ध वारसा आहे. दरम्यान उत्तर अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता. या पुतळ्याची चोरी झाल्यामुळे सॅन जोसे शहरातील नागरिकांना खूप दुःख झाले असून; या घटनेबाबतच्या अपडेट लवकरच दिल्या जातील, असेही उद्यान विभागाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
शिवप्रेमींमध्ये नाराजी : खरंतर, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे. ते एक भारतीय शासक आहेत ज्यांनी १६०० च्या उत्तरार्धात इस्लामिक आक्रमकांविरुद्ध लढा दिला आणि मराठा साम्राज्याची स्थापना केली. ते एक महान योद्धा तर होतेच पण त्यांचं शौर्य, रणनीती, कौशल्य सगळ्यांसाठी प्रेरणादायी होते. त्यांनी नेहमीच स्वराज्याच्या हितासाठी लढा दिला. मराठी वारसा टिकावा यावर त्यांनी भर दिला. आज शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्र ताठ मानेने आणि सन्मानाने जगतो आहे. त्यामुळे त्यांचाच पुतळा चोरी गेल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी आहे.