बारामती - जेजुरी येथे उभारण्यात आलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाला. या सोहळ्या प्रसंगी खासदार संभाजीराजे छत्रपती हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाला युवराज यशवंतराव होळकर व खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जेजुरी संस्थानच्यावतीने उभारण्यात आलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण काल (१२ फेब्रुवारी) पहाटेच भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. पडळकर यांनी पुतळा अनावरणानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर कडवट टीका करून पवार यांनी आपल्या भ्रष्ट हातांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला हात लावू नये, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा अनावरण व लोकार्पण सोहळा पार पडला.
काय म्हणाले पडळकर -
शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी व जातीयवादी माणसानं अहिल्यादेवींच्या पुतळ्याला हात लावू नये, या पुतळ्याचे अनावरण करू नये, अशी अनेकांची भावना होती. त्यामुळे आम्हीच हा सोहळा पार पाडला. अहिल्यादेवी यांचं काम अखंड भारतात आहे. अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत आणि काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत त्यांचं काम आहे. अहिल्यादेवी यांचे प्रजाहितकारी कार्य पाहता. त्याच्या बरोबर उलटी प्रतिमा शरद पवार यांची आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. असे पडळकर म्हणाले होते.