पुणे : केंद्र सरकारने देशातंर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन निर्यातीवर तब्बल 40 टक्के शुल्क लावल्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकार 31 डिसेंबरपर्यंत कांदा निर्यातीवर शुल्क लावले आहे. या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी सरकारच्या विरोधात आंदोलन केलं जातं आहे. याबाबत राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, शेतकरी जे सांगतात तेच खरं असून राज्य सरकार कांद्याच्या प्रश्नाबाबत लवकरच केंद्र सरकारला शिफारस करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
राज्याच्या वतीने केंद्र शासनाला शिफारस: पुण्यात आज मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आनंद मंडळाची बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यभरातील कांदा शेतकरी तसेच व्यापारी देखील उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले की, केंद्र सरकारने जो कांदा निर्यातीवर शुल्क लावले आहे त्याबाबत जो काही संभ्रम निर्माण झाला आहे. त्यानंतर केंद्र सरकारने 24 रुपयाने 2 लाख टन कांदा खरेदीला परवानगी दिली आहे. त्यानुसार काही ठिकाणी खरेदी केंद्र देखील सुरू करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी केंद्र सुरू करावे लागणार आहे. शेतकरी, व्यापारी सर्वांचीच आजच्या बैठकीत मागणी केली की, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी. त्याचा विचार करता लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्याशी बोलून लवकरच केंद्र सरकारला देखील राज्य सरकारच्या वतीने शिफारस करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांवरील लाठीचार्जवर काय म्हणाले सत्तार? : मंत्री अब्दुल सत्तार पुढे म्हणाले की, आज मार्केटमध्ये कांद्याला सतरा ते अठरा रुपयांचा भाव असताना देखील सरकार चोवीस रुपयांनी कांदा खरेदी करत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मागे असून भविष्यात विविध पिकांना देखील कशा पद्धतीने मागणी येईल याचा विचार करणार आहे. नाशिकमध्ये आज शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. याबाबत अब्दुल सत्तार म्हणाले की, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज होणे हे दुर्दैवी बाब आहे. कुठेही शेतकऱ्यांवर अशा पद्धतीचा अन्याय होता कामा नये. त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे.
देशात इतका टन कांदा उपलब्ध: मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, आज देशात 40 ते 45 लाख टन कांदा उपलब्ध आहे. देशात दर महिन्याला 17 ते 18 लाख टन कांद्याची मागणी असते. नवीन कांदा हा सप्टेंबर अखेर पर्यंत येणार आहे. मागील वर्षी देखील 45 कोटी रुपयांचा कांदा हा निर्यात करण्यात आला होता. तसेच चालू आर्थिक वर्षात देखील तीन महिन्यांमध्ये 997 कोटींचा कांदा निर्यात करण्यात आला आहे. अशाच शेतकऱ्यांकडे जो आठ ते नऊ लाख टन कांदा शिल्लक आहे. येत्या दोन महिन्यात तो टप्प्याटप्प्याने विक्री करण्यात येणार आहे आणि कांद्याला भाव देखील मिळणार आहे. तसेच पहिले शेतकरी आणि नंतर खाणाऱ्याचा देखील विचार केला पाहिजे, असे देखील यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले.
हेही वाचा: