पिंपरी चिंचवड (पुणे) Natya Sammelan 2024 : कला, साहित्य, नाटक, संगीत या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात. हा वारसा जपताना आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणं शासनाचं कर्तव्य असून या कर्तव्य भावनेतून शासन नाट्य चळवळीच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या हस्तांतरण सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
लोककला अत्यंत समृद्ध : समृद्धीची खरी निशाणी साहित्य आणि कला आहे, असं सांगून फडणवीस म्हणाले की, हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक, लोककला अशा विविध नाट्य प्रकारांनी रसिकांचे मनोरंजन केलं आहे. आपल्याकडील लोककला अत्यंत समृद्ध आहेत. लोककला समृद्ध करून त्यातून अर्थार्जन व्हावं, लोककलेचं संवर्धन व्हावं यासाठी योजना तयार करण्यात येतील. दिवंगत विक्रम गोखले यांनी २ एकर जागा वृद्ध कलावंतांसाठी दिली आहे. त्या ठिकाणी होणाऱ्या कामाचा आराखडा तयार करावा त्यासाठी सर्व सहकार्य शासनातर्फे करण्यात येईल.
१०० वे नाट्य संमेलन म्हणजे केशराने बहरलेले उद्यान : प्रेक्षकांच्या जो निकट असतो तो अभिनेता असतो. समाजात संवेदनशीलता रहावी यासाठी नाट्य कलावंताचे कार्य महत्वाचं आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेकडे संवेदनशीलता नसल्यानं कृत्रीम बुद्धीमत्ता कितीही विकसित झाली तरी कला, नाटक, गीत, संगीत यावर परिणाम होणार नाही. अण्णासाहेब किर्लोस्कार यांनी नाट्य संमेलनाला ‘केशराचं शेत’ ही उपमा दिली आहे. १०० वे नाट्य संमेलन म्हणजे ‘केशराने बहरलेले उद्यान’ आहे असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले. कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, नाट्य संमेलनाध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.
राज्याच्या अमृतकाळात रंगभूमीच्या वैभवासाठी मंथन व्हावे : २०३५ साली महाराष्ट्राचा अमृतकाळ असेल. यावेळी आपले सांस्कृतिक क्षेत्र कुठे असेल याचा विचार करण्याची गरज आहे. या क्षेत्राच्या विकासाची कल्पना कलावंत करू शकतात, शासन त्यासाठी आवश्यक सहकार्य करेल. मराठी रंगभूमी आणि मराठी रंगकर्मी यांनी या देशातील रंगभूमी टिकविण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी रंगभूमी सर्वोत्तम असल्याने ती टिकविणं, जगविणं आपली जबाबदारी आहे. मूकपट, बोलपट येऊनही नाटक संपलं नाही. कारण मराठी नाटकांनी समृद्ध रसिक तयार केला आणि मराठी रसिक जीवंत असेपर्यंत नाटक संपू शकत नाही. आज जागतिक स्तरावर मराठी रसिक असल्यानं जगात मराठी नाटक पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील नाट्य चळवळ अधिक बहरेल-सुधीर मुनगंटीवार : नाट्य संमेलनाचं भव्यदिव्य आयोजन झाल्याचं नमूद करून सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्रालाही नाटक आणि चित्रपटांची गौरवशाली परंपरा आहे. त्यामुळं राज्यातील नाट्यचळवळ निश्चितपणे बहरेल. नाटक पाहिल्यावर चेहऱ्यावर दिसणारे हास्य ही रसिकांची खरी श्रीमंती आहे. नाट्य हे एक हृदयातून दुसऱ्या हृदयापर्यंत संदेश पाठविण्याचं प्रभावी माध्यम आहे. नाटक मनोरंजनासोबत दिशा देतं कुटुंबासह एकत्रित नाटक पाहण्याचा आनंद निराळाच असतो.
सांस्किृतक वैभवावरून राज्याची श्रीमंती कळते : संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात नाटकाचा भाव पोहोचून रसिकांनी तिकीट काढून नाटक पाहावे. महाराष्ट्रात या माध्यमातून नाट्य रसिकांची संख्याही वाढावी. याबाबत १०० व्या नाट्य संमेलनाच्या माध्यमातून चिंतन व्हावे आणि या नाट्य संमेलनाच्या माध्यमातून आपले सांस्कृतिक वैभव जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन त्यांनी केलं. मुनगंटीवार पुढे म्हणाले, राज्याच्या सांस्किृतक वैभवावरून त्या राज्याची श्रीमंती कळते. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नाट्य क्षेत्रात अनुकूल बदल करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. त्यासाठी ७५ नाट्यगृह बांधण्याचा संकल्प शासनाने केला आहे. ही निर्णय पूर्णत्वास नेण्यात येईल. त्यासोबतच सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांची ५२ नाट्यगृहांमध्ये आधुनिकता आणण्याचा प्रयत्न आहे.
नाटक आणि संगीताला राजाश्रय मिळावा : संमेलनाध्यक्ष डॉ.जब्बार पटेल म्हणाले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यापासून राज्यातील लोकप्रतिनिधींनी सांस्कृतिक क्षेत्रावर प्रेम केले आहे. महाराष्ट्रातील राजे-महाराजांनी संगीताला आश्रय दिला आहे. ही सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्याचे काम नवी पिढी करणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना नाट्य, संगीताचे शिक्षण दिले गेल्यास त्यांची सांस्कृतिक जाण अधिक प्रगल्भ होईल. विद्यापीठातून उत्तम नट, गायक तयार व्हावेत यासाठी विद्यापीठातील कला विभागाला शासनाने आर्थिक सहकार्य करावे. मराठी नाट्य संमेलनात परदेशी नाटकेही दाखवली जावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
साहित्य आणि नाट्य चळवळ गतिमान करण्याचे कार्य : प्रा.जोशी म्हणाले, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि नाट्य परिषद या दोन्ही एकमेकांना पूरक संस्था आहे. साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे अनेक साहित्यिक आहेत. साहित्य संमेलन हा वाङ्मयीन उत्सव आणि नाट्य संमेलन हा नाट्यकलेचा उत्सव आहे. दोघा संमेलनांनी साहित्य आणि नाट्य चळवळ गतिमान करण्याचे कार्य केलं, असं त्यांनी सांगितलं. कला व्यवहार जाणतेपणाने जाणून घेणारे कलामानस तयार होण्याची गरज आहे.
महापालिका प्रशासनाला दिलं धन्यवाद : नाट्य परिषदेचे अध्यक्ष दामले म्हणाले की, शासनाने नाट्य संमलेनासाठी दिलेल्या निधीचा योग्य विनियोग करण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नाट्यगृहांचे विद्युत शुल्क कमी केल्यामुळं त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका प्रशासनाला धन्यवाद दिलं. नाट्यगृहाच्या व्यवस्थापनात ज्येष्ठ रंगकर्मींना जबाबदारी दिल्यास नाट्यगृहांच्या समस्या कमी होतील.
सोलापूर शाखेकडे नटराजमूर्ती सुपूर्द : यावेळी भोईर यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केलं. यावेळी पिंपरी चिंचवड शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आणि कलाकारांचा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांच्याहस्ते आधुनिक 'महाराष्ट्राची जडण घडण - नाट्य कोश’ च्या दहाव्या खंडाचे प्रकाशन करण्यात आलं. यानंतरचे नाट्य संमेलन सोलापूर येथे होणार असल्याने, सोलापूर शाखेकडे नटराजमूर्ती आणि नाटकाची घंटा सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, महेश लांडगे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, नाट्य परिषदेचे सर्व विश्वस्त, नाट्य कलावंत आणि नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा -