पुणे - राज्यात प्रभावी ठरलेल्या 'बारामती पॅटर्न'ने नियोजनबद्ध काम करून बारामतीत कोरोनाला थोपवण्यात यश मिळवले. काही दिवसातच बारामती कोरोनामुक्त केली. या सुखद घटनेनंतर आता तालुका पातळीवर बारामतीत कोव्हिड-१९ आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. बारामतीतील रुई शासकीय ग्रामीण रुग्णालयात कोव्हिड-१९ आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून कोरोना बाधितांवर उपचार करणे शक्य होणार आहे. पुण्यातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशावरून या आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नांदापूरकर यांनी दिलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंजुरी दिली. अवघ्या पंधरा दिवसात या केंद्राची उभारणी करण्यात आली. बारामतीतील रुई शासकीय ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कोविड १९ आरोग्य केंद्रात कोरोना बाधितांसाठी सध्या ३० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ६ आयसीयू बेड तयार करण्यात आले आहेत.
आयसोलेशनासाठी १६ बेड तर कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी ८ बेड तयार करण्यात आले आहेत. याशिवाय सेंट्रल ऑक्सिजन, गॅस लाईन अद्ययावत कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. याआधीच बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. बारामतीत कोव्हिड१९ आरोग्य केंद्र उभारण्यासाठी लोक सहभागाबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, सहाय्यक अभियंता विश्वास ओहोळ, कनिष्ठ अभियंता नांदखिले व अन्य सहकाऱ्यांसह नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, संभाजी होळकर व प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय कुमार तांबे, डॉ. सुनील दराडे, डॉ. मनोज खोमणे आदींनी या कामासाठी विशेष प्रयत्न केले.
आरोग्य केंद्रातील सुविधा
अत्याधुनिक आयसीयू ६ बेड
आयसोलेशन १६ बेड
संशयित रुग्णांसाठी आठ बेड
सेंट्रल ऑक्सिजन, गॅस लाईन
अद्ययावत कंट्रोल रूम