पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे आगारातील बंद असलेली एसटी बस सेवा पुन्हा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटात तळेगाव दाभाडे बस आगाराला साडेतीन कोटींचा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे, अशी माहिती आगार प्रमुख तुषार माने यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. दरम्यान, आजपासून प्रायोगिक तत्वावर तालुक्यात पाच एसटी बस प्रवासी वाहतूक करणार आहेत. दिवसातून तीन फेऱ्या होणार आहेत.
माहिती देताना आगार प्रमुख आगार प्रमुख माने म्हणाले की, अडीच महिन्यानंतर मावळ तालुक्यात एसटी बसची वाहतूक सुरू केली आहे. प्रायोगिक तत्वावर 5 बसचे नियोजन केले आहे. दिवसातून तीन फेऱ्या होणार आहेत. तालुक्या अंतर्गत, तालुक्याच्या बाहेर आणि जिल्ह्या बाहेर अशी एसटी बस हळूहळू वाहतूक सुरू करणार आहे. एसटीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याची खबरदारी घेतली जात असून केवळ 22 प्रवाशांची वाहतूक केली जाणार आहे. प्रवाशांना मास्क बंधनकारक असणार आहे, असे तुषार माने यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले, अडीच महिन्यात तळेगाव दाभाडे आगाराला तब्बल साडेतीन कोटींचे नुकसान झाले आहे. दरम्यान, 207 एसटी बसने संपूर्ण मावळ परिसरातून 5 हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमारेषेवर पोहचवले आहे. यातून एक कोची 40 लाखांपर्यंत उत्पन्न मिळालेले असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - 'त्या' वाटसरूच्या खुनाचे आरोपी जेरबंद; शर्टच्या टॅगवरून लावला छडा