पुणे - पिंपरी-चिंचवड परिसरातून अनेक परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ राज्याच्या सीमारेषेवर सोडले जात आहे. शुक्रवारी देखील अशाच पाचशे पेक्षा अधिक मजुरांना पुणे रेल्वे स्टेशन येथून रेल्वेने त्यांच्या मूळ राज्यात रवाना करण्यात आले. यावेळी परप्रांतीय मजुरांनी महाराष्ट्र पोलीस जिंदाबादचा जयघोष केला.
पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी, भोसरी एमआयडीसी आणि तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परप्रांतीय मजुरांना पुणे रेल्वे स्थानकातून त्यांच्या मूळ राज्यात रवाना करण्यात आले. त्याअगोदर त्यांना फळं वाटप करण्यात आली असून सॅनिटायझर देखील देण्यात आले आहे.
हे सर्व मजूर पोलीस ठाण्याच्या परिसरातील असून विविध ठिकाणी काम करणारी आहेत. ज्या व्यक्तींना परराज्यात जायचे आहे त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन अर्ज करायचा असून त्यानंतर संबंधित व्यक्तीला पोलीस स्वतः फोन करून बोलवून घेणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, परराज्यातील मजुरांना महाराष्ट्रच सुरक्षित वाटत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले असले तरी त्यांच्या मूळ गावी जायचे असल्याचे ते सांगतात. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, राजेंद्र कुंठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलासे, वाघमारे आदी उपस्थित होते.