पुणे - चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनोरुग्ण मुलाने आईच्या गळ्यावर कात्रीने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे या अगोदरदेखील मुलाने आईच्या डोळ्याजवळ सुरीने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, एकुलता एक मुलगा असल्याने पोलिसांत तक्रार करण्यात आली नव्हती. सुमन सावंत (वय-६०) असे खून झालेल्या आईचे नाव असून भुपेंद्र सावंत (वय-४०) असे मनोरुग्ण आरोपी मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोरुग्ण भुपेंद्र याने रविवारी सकाळी आई सुमन यांच्या गळ्यावर कात्रीने वार करून खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाहून त्याने घराच्या पाठीमागील दरवाजातून पळ काढला. सकाळपासून दरवाजा का उघडला नाही, हे पाहण्यासाठी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर सुमन यांचा खून झाल्याचे उघड झाले. तात्काळ त्यांनी चिंचवड पोलिसांना याची माहिती दिली.
काही वर्षांपूर्वी मृत सुमन यांच्या पतीचे निधन झाले. तसेच काही महिन्यांपूर्वी सुमन यांच्या डोळ्याजवळ सुरी खुपसून खून करण्याचा प्रयत्न भुपेंद्रने केला होता. मात्र, आईने प्रेमापोटी मुलाची तक्रार पोलिसांत दिली नव्हती. भुपेंद्र सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.