पुणे(बारामती) - कोरोना विषाणूच्या प्रसाराला आटकावासाठी व्यक्तिगत स्वच्छतेसह सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व देण्यात आले आहे. यासाठी साबण व सॅनिटायझरने नियमित हात स्वच्छ करण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार ना नफा ना तोटा तत्वावर केवळ समाज सेवा घडावी या हेतूने बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या माध्यमातून १०० टक्के विषाणू नाशक सॅनिटायझरची( हँडवॉश) निर्मिती केली जाणार आहे. ५० हजार लिटर सॅनिटायझरची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे डिस्टलरी मॅनेजर सतीश निंबाळकर यांनी दिली.
सॅनिटायझर तयार करण्यासाठी जिल्ह्यातील आठ कारखान्यांना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी नुकतीच परवानगी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून सर्वत्र सॅनिटायझर आणि हँडवॉशचा तुटवडा निर्माण झालाा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी सॅनिटायझर तयार करण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार ८ कारखान्यांना परवानगी दिली असून बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा यात समावेश आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी अल्पदरात सॅनिटायझर तयार करण्यात येणार आहे. सोमेश्वर कारखान्याच्या माध्यमातून ५० हजार लिटर सॅनिटायझरची निर्मिती करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात २० हजार लिटर तयार केले जाणार आहे. या सॅनिटायझरची किंमत बाजारभावापेक्षा कमी असणार आहे. म्हणजेच सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या २०० एम. एल. सॅनिटायझरची किंमत १३० ते १५० रुपये पर्यंत आहे. मात्र, कारखान्याने तयार केलेल्या सॅनिटायझरची किंमत एक लिटर ला केवळ १५० रुपये पर्यंत असणार आहे.
नफा तोट्याचा विचार न करता सर्वसामान्य नागरिकांना बाजारभावापेक्षा स्वस्त दरात अँटी सेप्टीक सॅनिटायझर मिळावे या हेतूने, कारखान्याच्या माध्यमातून याची निर्मिती केली जात आहे. या अल्प दारातील सॅनिटायझरचा बारामती तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याची माहिती ही निंबाळकर यांनी दिली आहे.
ग्रामपंचायतीच्या मार्फत सॅनिटायझरचे होणार वाटप...
लॉकडाऊन व संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर कारखान्याने तयार केलेले सॅनिटायझर बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मार्फत घरोघरी वितरित करण्यात येणार असल्याचे कारखान्याकडून सांगण्यात आले आहे. एक लिटर सॅनिटायझर केवळ 150 रुपयात मिळणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे.