बारामती (पुणे) - टाळेबंदीच्या काळात सर्वकाही ठप्प होते. मात्र, त्याच वेळी बारामतीतील इंजीनियरिंगचे चार विद्यार्थी प्रदूषणमुक्त सौर उर्जेवर चालणारी कार ( Solar Car ) बनविण्यात व्यस्त होते. आज हे सर्वसामान्यांना परवडणारे चारचाकी वाहन रस्त्यावर धावण्यास सज्ज झाले आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा विशेष अहवाल.
आज जगभरात वायु प्रदूषणना बरोबरच इंधन दरवाढीची समस्या भेडसावत आहे. अशावेळी बारामतीतील अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या चार विद्यार्थ्यांनी सौर उर्जेवर चालणारी प्रदूषणमुक्त चारचाकी वाहनाची निर्मिती केली आहे. हे वाहन 70 ते 80 हजार रुपयांत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.
ललित मोहिते, पियूरा उगले, अभिषेक शेळके, मिनेश गवळे या विद्यार्थ्यांनी या वाहनाची निर्मिती केली आहे. सध्या वाढत्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली आहे. मात्र, यापेक्षा वेगळे काहीतरी करण्याची कल्पना या विद्यार्थ्यांमध्ये होती. त्यानुसार या विद्यार्थ्यांनी एकत्रित येत सेल्फ चार्ज व्हेईकल ( Self Charge Vehicle ) बनवण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी सौर उर्जेवर चालणाऱ्य वाहनांची निर्मिती केली. या वाहनाच्या निर्मितीबद्दल विद्यार्थी सांगतात की, सध्या बाजारात वायुप्रदूषण रोखण्यासाठी बरीच वाहने उपलब्ध आहेत यापेक्षा वेगळे काहीतरी करण्याची कल्पना आम्हाला सुचली. त्यानुसार सौर उर्जेवर धावणारे चारचाकी वाहन बनवले.
रात्रीही चालु शकते सोलर कार - या वाहनाला पुढच्या बाजूला एक शंभर वॅट सोलर पॅनल व मागील बाजूस 42 वॅटचे दोन पॅनल बसवले आहेत. 48 वॅटची बॅटरी एका तासात पूर्ण चार्ज होते. ही गाडी दिवसा चार्ज करण्याची कसलीही गरज नाही. तसेच रात्री नऊ तास गाडी चालू शकते, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.
मोबाईल, लॅपटॉपही होते चार्ज - चार आसनी हे वाहन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना परवडू शकते. या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या गाडीमध्ये चारशे किलोपेक्षा अधिक वजन वाहू शकते. घरातील वीज गेल्यानंतर मोबाईल, लॅपटॉप व घरातील 35 वॅटपर्यंतची इतर उपकरणे सहज वापरता येऊ शकतात.
- गाडीची वैशिष्ट्ये -
- 100 टक्के सौर उर्जेवर धावते.
- दिवसा कधीही चार्जिंग संपत नाही.
- 100 टक्के प्रदूषण मुक्त.
- मोबाईलवरून ऑपरेट करता येते.
- घरातील 35 वॅट पर्यंतची उपकरणे वापरू शकतो.
हेही वाचा - कडधे येथे युवकाचा खून प्रकरण; दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर मृतदेह सापडला