पुणे- शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. पुणे शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासन आणि कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून उपाययोजना करुन देखील 60 कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नर्स आणि सफाई कर्मचारी यांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई आणि महापालिकेत नोकरी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने यापूर्वीच घेतला आहे. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या सेवकांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळावा यादृष्टीने काम सुरू असल्याचे महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांच्यावर जाऊन पोहोचली आहे. हे संकट आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासन,कर्मचारी अहोरात्र झटत आहेत.