पिंपरी चिंचवड : औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात एक अद्भुत शिव मंदिर बनवण्यात आलंय. या मंदिरात एक-दोन नव्हे तर तब्बल १ हजार १११ महादेवाच्या पिंडी साकारण्यात आल्या आहेत. तसेच या तीन मजली मंदिराच्या वर कळस बसवण्याऐवजी २५ फुटांची भव्य पिंड बसवण्यात आलीय.
मंदिराच्यावर २५ फुटाची महादेवाची पिंड : पिंपरी चिंचवडमधील चिखली जाधव वाडी येथे एक कैलास सरोवर मंदिर आहे. या मंदिरात महादेवाच्या ११११ पिंडी आहेत. मंदिराच्या मुख्यद्वारावर भगवान शिव शंकराची मोठी मूर्ति आहे. तर मंदिराच्या समोर नंदी आणि पिंडाची मोठी भव्य मूर्ती आहे. श्रावण महिन्यात आणि अन्य दिवशी या मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या मंदिराची एक विशेष गोष्ट म्हणजे मंदिराच्यावर असलेली २५ फुटाची महादेवाची पिंड आहे. हे कैलास सरोवर मंदिर बनविण्यामागे एक वेगळीच कहाणी आहे.
खोदकाम करताना पिंड सापडली : ईश्वर गुंडे उर्फ साईराम यांच्या कुटुंबाला त्यांच्या चिखलीमधील या जागेत एक बंगला बांधायचा होता. मात्र जेव्हा बंगल्याचे बांधकाम सुरू झाले, तेव्हा त्यांच्यासोबत असे काही किस्से घडले की त्यानंतर त्यांनी तेथे बंगल्याऐवजी एक भव्य मंदिर उभारलं. तेथे खोदकाम करताना त्यांना एक पिंड सापडली. त्यानंतर साईराम बाबांनी इथे १ हजार १११ महादेवाच्या पिंडी स्थापित केल्या. त्याचबरोबर त्यांनी या मंदिरात १२ ज्योतिर्लिंग बनवले.
अनेक मंदिर उभारले : ईश्वर गुंडे यांनी मंदिरावर २५ फुटाची भव्य महादेवाची पिंड उभारली. ही पिंड लांबूनच दिसून येते. त्यानंतर साईराम बाबा यांनी एकाच ठिकाणी शंकराच्या १ हजार १११ पिंड, राम दरबार, हनुमान मंदिर, संतोषी माता मंदिर, दर्गा, गणपती मंदिर, विष्णू मंदिर, साई मंदिर असे अनेक मंदिरं उभारली आहेत.
मंदिराला शिव शक्तीपीठ बनवायची इच्छा : ईश्वर गुंडे यांना कैलास मान सरोवर मंदिराला शिव शक्तीपीठ बनवायची इच्छा आहे. त्यांचं म्हणणं आहे की, इथे महादेवाच्या पिंडीचं दर्शन केल्यानंतर भक्तांना जिवंत शंकराचं दर्शन केल्याची अनुभूती मिळेल. पिंपरी चिंचवडमधील या कैलास मानसरोवर मंदिरात श्रावण मासाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी पाहायला मिळते. येथे दर्शन घेतल्यावर मन:शांती मिळत असल्याचा अनुभव भक्त सांगतात.
हेही वाचा :