भीमाशंकर (पुणे) - बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्यात देशभरातून दिवसाला हजारो भाविक हजेरी लावत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे भीमाशंकर मंदिर 12 मार्च पासुन बंद ठेवण्यात आले आहे. याचा परिणाम परिसरातील हॉटेल, लॉजिंगसह पुजेचे साहित्य, वनऔषधी विक्री करणाऱ्या लहान-लहान व्यापाऱ्यावर झाला आहे. कोरोनामुळे भाविक पर्यटकांचा वावर नसल्याने या व्यावसायिकांवर बेकारीची वेळ आली आहे.
भीमाशंकर येथे दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक व पर्यटक येत असतात. त्यामुळे श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे उच्चांक गर्दी असते. यामुळे या परिसरातील नागरिकांच्या हाताला काम व व्यवसाय मिळत असतो. मात्र, यंदा गेल्या चार महिन्यापासून मंदिर व भिमाशंकर परिसरातील पर्यटन बंद असल्याने या परिसरात एकही पर्यटक व भाविक येत नसल्याने या परिसरातील हॉटेल व्यवसाय व मंदिर परिसरातील हार फुलांची दुकाने बंद आहेत. त्यामुळे अनेकांवर पुढील काळात आर्थिक संकट ओढावून उपासमारीची भीती येथील आदिवासी नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे सरकारने भीमाशंकर परिसरातील आदिवासी नागरिक व येथील छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी उपाययोजना करावी, अशी मागणी येथील व्यावसायिक करत आहेत.