पुणे - शहरातील इफ्को टोकीओ विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पुणे शहराध्यक्ष संजय मोरे, नगरसेवक विशाल धनवडे यांच्यासह १० शिवसैनिकांचा समावेश आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
कोरेगाव पार्क परिसरातील मंगलदास रोडवर इफ्को टोकीओ कंपनीचे कार्यालय आहे. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या कार्यालयात कामकाज सुरू होते. यावेळी 30 ते 40 शिवसैनिक कार्यालयात घुसले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज अखेर पोलिसांनी कारवाई करीत नऊ शिवसैनिकांना अटक केली.
हे वाचलं का? - पुण्यात शिवसैनिकांचा राडा; पीक विम्याच्या पैशांसाठी फोडले विमा कंपनीचे कार्यालय
राज्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे तातडीने मिळावेत, या मागणीसाठी शिवसैनिकांकडून असे हिंसक आंदोलन करण्यात आले. यापूर्वी वेळोवेळी निवेदने देऊनही कंपनीकडून शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आंदोलन करण्यात आल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.