पुणे - महाआघाडीला सत्तेत येऊन आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, या कालावधीत त्यांनी एकदाही मराठा आरक्षणासंदर्भात बैठक घेतली नाही. किंवा त्या दृष्टीने पावले उचलली नाही. दोन ते तीन दिवसात सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली नाही तर सरकार विरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमोर जागरण गोंधळ घालून आंदोलन करू, असा इशारा मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला आहे.
पुण्यात आज (सोमवारी) मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारविरोधात जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले. पुण्यातील बालगंधर्व चौकात झालेल्या या आंदोलनाला मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मेटे बोलत होते.
ते म्हणाले, आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. मात्र, या सुनावणीसंदर्भात लागणारी आवश्यक ती काळजी महाविकास आघाडीचे सरकार घेताना दिसत नाही. मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यासाठी हे सरकारकडे आग्रह धरत नाही. त्यामुळे झोपी गेलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
तसेच मराठा आरक्षणाच्या बाबतीत असलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांच्या अखत्यारित आहे. मात्र, याबाबती ते निष्क्रिय आहेत. त्यांच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण जातेय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही मेटे यांनी केला. म्हणून चव्हाण यांना अध्यक्षपदावरून दूर ठेवण्यात यावे, अशी मागणीही मेटे यांनी यावेळी केली. तर दोन ते तीन दिवसात सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली नाही तर सरकार विरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. शिवाय महाविकास आघाडीचे मंत्री राज्यात ज्या ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी त्यांच्यासमोर अशा प्रकारचा जागरण गोंधळ घातला जाईल, असा इशाराही विनायक मेटे यांनी यावेळी दिला.