पुणे - गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांनी मनोहर पर्रिकरांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मनोहर पर्रिकर यांच्याशी माझी गेल्या 25 वर्षापासूनची मैत्री होती. त्यांच्या आयआयटी पवई येथील कामकाजापासून सुरुवात झाली होती. मराठा ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे ते अध्यक्षापासून मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचे काम त्यांच्याकडून करण्यात आले होते. त्यावेळी मी त्यांना अनेक वेळा निमंत्रित केले होते. त्यांच्या अत्यंत साध्या व प्रेमळ स्वभावाने त्यांनी आमचे मन जिंकले होते. भारताच्या राजकारणात सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. ज्यावेळी ते देशाचे संरक्षणमंत्री झाले, त्यावेळी विविध कामांच्या निमित्ताने माझे त्यांच्याशी जवळीक वाढली, मात्र आता आम्ही चांगले नेतृत्व गमावल्याचे दुखः वाटते.
पर्रिकर यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते ते गोव्याचे मुख्यमंत्री हा प्रवास मोठा आहे. केंद्रातील संरक्षण मंत्रालयाचा पदभारही पर्रिकर यांना काही काळ सांभाळला. यानंतर त्यांना पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी गोव्यात पाठविण्यात आले होते.