पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी भाषण करताना शरद पवारांनी शिवाजी महाराजांचा संदर्भ दिला. देशातला पहिला सर्जिकल स्ट्राइक शिवाजी महाराजांनी केला, असे शरद पवार म्हणाले.
पहिला सर्जिकल स्ट्राइक शिवाजी महाराजांनी केला : या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या बंडानंतर प्रथमच अजित पवार आणि शरद पवार एका मंचावर उपस्थित होते. यावेळी शरद पवार नेमकं काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. शरद पवार यांनी आपल्या भाषणात पुणे ऐतिहासिक भूमी असल्याचे म्हटले. आजकाल देशात आपल्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केल्याची चर्चा होते. मात्र देशातील पहिला सर्जिकल स्ट्राइक शिवाजी महाराजांनी केला होता, असे ते म्हणाले. याबद्दलचा दाखला देताना, शाहिस्तेखान जेव्हा लाल महालात आला होता, तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याची बोटे छाटून देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक केला होता, असे शरद पवार म्हणाले.
पत्रकारावर दबाव नसावा ही लोकमान्य टिळकांची भूमिका : यावेळी बोलताना शरद पवार यांनी सध्याच्या देशातील परिस्थितीवरून सरकारवर निशाणा साधला. पत्रकारांवर दबाव नसावा ही लोकमान्य टिळकांची भूमिका होती, असे ते म्हणाले. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी सामान्य माणसांना जबरदस्त शस्त्राची आवश्यकता आहे, हे त्यांनी जाणले होते. त्यामुळेच त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केल्याचे शरद पवार म्हणाले.
कार्यक्रमाला अनेक दिग्गजांची उपस्थिती : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी 'लोकमान्य टिळक पुरस्कार' स्वीकारण्यासाठी पुण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. विशेष म्हणजे, राज्यातील सत्तानाट्यानंतर मोदी आणि पवार प्रथमच एका मंचावर दिसले.
हेही वाचा :