जुन्नर (पुणे) - ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार, असे महाविकास आघाडीतून सांगितले जात आहे. असे असताना पुणे जिल्ह्यात मात्र शिवसेना ग्रामपंचायत निवडणूका स्वबळावर लढवणार, असे माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी सांगितलं. ग्रामपंचायत निवडणुका एकत्र लढवण्याचे आदेश नसून स्थानिक पातळीवरील राजकारण पाहून स्वतंत्र निवडणुक लढविण्याचे संकेत पक्ष श्रेष्ठीकडूनच देण्यात आले असल्याचे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले. यामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
काय म्हणाले आढळराव पाटील
आघाडीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूका लढवल्या जात आहेत. मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो की, तसा आपल्याला कोणताही आदेश वरिष्ठाकडून नाही. मी जेव्हा नेत्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की, तुमचं स्थानिक राजकारण पाहून तुम्ही ठरवा. तुम्हाला वाटलं की, आघाडी करून फायदा होत असेल तर तुम्ही आघाडी करा. पण आपल्या तालुक्याचा विचार केला, तर तुम्हाला आमंत्रण द्यायला कोणी येणार नाही. घे ऊठ चल, आम्ही तुमच्या बरोबर आघाडी करायला तयार आहे. असा तर स्वभाव राष्ट्रवादी काँग्रेसचा नाहीच आणि म्हणून तुम्ही तुमचं स्वबळावर आपल्या ताकतीवर उभं राहायचे, आपल्या ताकतीवर लढायचे. हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, असे आढळराव पाटील यांनी सांगितलं.
शिवसैनिक ग्रामपंचायतीवर आस्तित्व दाखवणार?
पुणे जिल्ह्यात 734 तर शिरुर लोकसभा मतदारसंघात 294 ग्रामपंचायतमध्ये निवडणूका होत आहेत. राजकारणात व समाजकारणात ग्रामपंचायत हा मुख्य पाया असतो. त्यामुळे शिवसैनिकांनी ग्रामपंचायतीवर आपले आस्तिव टिकवून, आपले आस्तिव दाखविण्यासाठी तयारीला लागण्याचे संकेत माजी खासदार आढळराव पाटील यांनी दिले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांना घडविण्याची हीच योग्य वेळ
पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य वर्चस्व जिल्हा बँक, ग्रामपंचायत, सोसायट्यांवर आहे. राजकारणातील मुख्य शक्तीस्थान ग्रामपंचायतपासून सुरु होते. मात्र यामध्ये शिवसेना मागे पडत चालली आहे. गावचा कार्यकर्ता हा नेत्यांना घडवत असतो. मात्र आता ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांना घडविण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे आताची ग्रामपंचायत निवडणुक ही तुमच्या आमच्या आस्तित्वाची लढाई आहे. तुम्ही नेत्यांना जिंकवलं आता तुम्हाला जिंकवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येणारी निवडणुक ही शिवसेना स्वबळावर लढविणार आणि आपले आस्तित्व दाखविणार, असे देखील आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - धक्कादायक : बारामतीत आढळला जळालेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह
हेही वाचा - शिक्षकेतर संघटना आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम; शुक्रवारी राज्यातील सर्व शाळा बंदची हाक