पुणे - शिरुर लोकसभा मतदार संघात उद्या चौथ्या टप्प्यातील लोकसभेचे मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून सर्व शासकीय कर्मचारी मतदान केंद्रावर साहित्य व ईव्हीएम मशिन सह आज सायंकाळ पोहोचणार आहेत. याचा आढावा ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी घेतला आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघात सर्वाधिक महिला निवडणूक कर्मचारी असल्याने कामाचा सर्वाधिक भार महिलांच्या खांद्यावर असल्याचे सहाय्यक निवडणूक आधिकारी सुचित्रा आमले यांनी सांगितले. जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरुर, भोसरी, हडपसर या विधानसभा मतदारसंघानुसार सहाय्यक निवडणूक आधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ही निवडणूक पार पडणार आहे. मोठ्या संख्येने निवडणूक कर्मचारी, पोलीस, दंगल विरोधी पथक सज्ज झाले आहे.
विधानसभा क्षेत्रातुन एसटी बस व खाजगी वाहने यांमधुन निवडणूक साहित्य मतदान केंद्रापर्यत पोहचविण्यात येणार आहे. त्यासाठी आज सकाळपासूनच आधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ सुरु असल्याचे चित्र पहायला मिळाले.
या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे आणि शिवसेनचे उमेदवार आणि विद्यमान खासदार आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. जातीय राजकारणामुळे ही लढत राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे.