पुणे : आपण अनेक यशस्वी खेळाडूंच्या कहाण्या ऐकतो. परंतु परिस्थितीवर मात करून आपले भवितव्य घडवणारे खेळाडू हे प्रेरणादायी ठरतात. पुण्यातील अशाच एका जिद्दी खेळाडूची कहाणी आज आपण पाहू या लहानपणापासूनच मेंढ्यांच्या मागे काठी घेऊन धावणारी बारामतीची रेश्मा आता थेट भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार झाली आहे. 'काठीने दगड मारण्याचा खेळ खेळणे, दगड हातात घेऊन पीचींग करणे, हुंदडणे पण त्याच काठीच्या आकाराची स्लगर हातात घेवून कधी भारतीय संघाचा खेळाडू नव्हे, तर भारतीय संघाचा कर्णधार बनेल असे स्वप्नातही वाटले नव्हते', अशी प्रतिक्रिया रेश्मा पुणेकरने यावेळी व्यक्त केली.
रेश्मा पुणेकरचा प्रवास : बारामतीच्या रेश्माचा हा प्रवास अतिशय संघर्षमय आहे. रेश्माने आजपर्यंत दोन आंतरराष्ट्रीय सामने, चीन आणि हाँगकाँग या देशात खेळले आहेत. आतापर्यंत तर एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 23 राष्ट्रीय सामन्यात तिने महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व केलेले आहे. 28 राज्यस्तरीय सामने तसेच 04 गोल्ड मेडल, 06 रजत पदक, 03 कास्य पदक आणि महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्राप्त केलेला आहे. ती हॉंगकॉंग, चिनसारख्या आगळ्यावेगळ्या देशात जाऊन दोन वेळा एशियन स्पर्धा खेळून आलेली आहे. रेश्मा पुन्हा एकदा हॉंगकॉंगसारख्या देशात होणाऱ्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय महिला एशियन कप 2023 या स्पर्धेत कर्णधार म्हणून नेतृत्व करणार आहे.
आंतरराष्ट्रीय खेळाडू : रेश्माचा बारामतीच्या जिरायती आणि दुष्काळी भागात झालेला आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. परिस्थितीच्या कंबरठ्यावर उभे राहून स्वतःचा खेळरुपी वलय निर्माण करणारी ती एक संघर्षशील, धैयशिल, कृतिशील आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे.आज रेश्मा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे शारिरीक शिक्षण विभागात एम. पी. एड ह्या वर्गात शिकत आहे. आज स्पर्धेमध्ये मिळालेले करंडक, मेडल, प्रमाणपत्रे अश्या मोल्यवान तिच्या आयुष्याच्या शिदोर्या ठेवण्यासाठी लाकडी कपाटसुद्धा तिच्याजवळ नाही. आधुनिक कोणती उपकरणे, साहित्य तिच्या घरामध्ये नाही. आई-वडीलांनी मुलीच्या खेळासाठी सगळ्या मेंढ्या, काही शेतीदेखील विकली आहे. परंतु आजही तिची परिस्थिती काळ बनून तिच्यासमोर उभी आहे. समाजातील दानशूरांना रेश्मा पुणेकरने मदतीचे आवाहन केले आहे.