पुणे - 'लेखणीची धार तलवारीपेक्षा अधिक असते, असे मी शिकलो होतो. मात्र, देशातील सध्याची परिस्थिती बघता यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. एल्गार परिषद प्रकरणात कार्यकर्त्यांवर हिंसा केली म्हणून नाही, तर त्यांनी व्यक्त केलेल्या शब्द आणि विचारांमुळे सरकारने कारवाई केली आहे,' अशी टीका काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केली.
पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने आयोजित केलेल्या लिटररी फेस्टिवलमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शशी थरूर सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील एल्गार परिषदेच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाईवर भाष्य केले.
देशात शब्द आणि संकल्पना मांडल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांच्या तलवारी बरोबर लेखणी कशी लढू शकते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मी शाळेत असताना लेखणीची धार तलवारीपेक्षा अधिक असते, असे शिकलो होतो. मात्र, आता यावर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. वरावरा राव, आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज यांच्यासारख्या साहित्यिकांवर त्यांनी लिहिलेल्या शब्द आणि विचारांमुळे सरकारने कारवाई केली आहे, असे थरूर म्हणाले.
का होतेय एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांना अटक -
पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी पार पडलेल्या एल्गार परिषद आयोजनात नक्षलवादी संबंध असल्याच्या कारणावरून आतापर्यंत देशभरातून तब्बल 12 जणांना अटक करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथील लढाईस 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषदचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी नक्षलवादी संघटनांनी आर्थिक पुरवठा करण्यासोबतच लोकांना चिथावणी दिल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.