बारामती : मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील मातब्बर नेते समजले जातात. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मोहिते पाटील हे पवारांसोबत होते. परंतु मध्यंतरीच्या काळात ते पक्षापासून दुरावले गेले. सध्या ते भाजपमध्ये आहेत. रविवारी त्यांनी पवारांसोबत कृषिक प्रदर्शनाची पाहणी केली. यासंबंधी पवार म्हणाले, विजयदादा यांना कृषि क्षेत्राबद्दल आस्था आहे. त्यांच्यासह अनेक मान्यवरांनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली आहे.
तरुणाई हे शेतीचे भविष्य : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रदर्शन पाहिल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. पुढे बोलताना पवार म्हणाले की,शेतीतील नवे बदल टिपण्यासाठी तरुणांची चाललेली धडपड या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने मला दिसून आली. तरुणाई हे शेतीचे भविष्य आहे. आणि शेतीतील नवीन शोधण्यासाठी ते पुढे येत आहेत. हीच बाब अत्यंत महत्वाची आहे. असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
शेतीमध्ये अमुलाग्र बदल : पवार म्हणाले, या देशातील बदल शेतकऱ्यांनी घडवला आहे. मागील पंधरा वर्षात जी शेती विषयक धोरणे झाली त्यातून अन्नधान्याचे उत्पादन वाढले आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहे. 252 दशलक्षणावरून आज 300 दशलक्षणाच्या पुढे गेलेले अन्नधान्याचा साठा हे हेच दर्शवते की शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अमुलाग्र बदल केलेला आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये मला तरुणांबरोबरच काही माझ्या ओळखीचे हजारो शेतकरी भेटले. त्यांनाही हे नवे तंत्रज्ञान खुणावत आहे. 80 टक्के तरुणांची या प्रदर्शनामधील संख्या पाहून मला अतिशय आनंद वाटला.
सत्तार यांना महत्त्व देऊ इच्छित नाही : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बारामतीत येत कृषिक प्रदर्शन पाहिल्यानंतर पवार कुटुंबीयांवर स्तुतीसुमने उधळली. यासंबंधी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, त्याला फार काही महत्त्व नाही. मी महत्त्व देऊ इच्छित नाही.
राजकीय प्रश्न विचारू नका : प्रकाश आंबेडकर हे सेनेसोबत युती करू इच्छितात. पण काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत सहभागी व्हायचे की नाही हे पुढचे पुढे बघू म्हणतात, या प्रश्नावर पवार म्हणाले, मला यासंबंधी काही माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही.कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसंबंधी त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, त्यासंबंधी तुम्ही अजित पवार यांना विचारा, मला राजकीय प्रश्न विचारू नका.