पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. आज शरद पवार यांची बीडमध्ये सभा होत आहे. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, शरद पवार यांनी कधीही कुठलीही गोष्ट यशासाठी केली नाही. ते कालही योद्धा होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार असल्याचे मत यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
खासदार अमोल कोल्हे गैरहजर असणार : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आज (गुरुवारी) पुणे दौऱ्यावर असून त्यांनी निसर्ग मंगल कार्यालय येथे भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. आज बीडमध्ये शरद पवार यांची सभा होत असून त्याला खासदार अमोल कोल्हे गैरहजर असणार आहेत. यावरून पुन्हा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, सगळीकडे सगळ्यांनीच जायचं नसतं. मी माझ्या प्रभागात आले आहे. बीडमध्ये लागलेल्या बॅनरबाबत सुळे म्हणाल्या की, याबाबत मला माहीत नाही. आज राज्यात पाऊस कमी झाला आहे. राज्यात पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. आज देशात आणि राज्यात महागाई, बेरोजगारी तसेच महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा असून केंद्र सरकारला याबाबत उत्तर द्यावे लागणार आहे, असे देखील यावेळी सुळे म्हणाल्या.
'हे' गृहमंत्र्यांचे फेल्युअर : राज्यात महिलांवरील वाढत असलेल्या अत्याचाराबाबत सुळे यांना विचारले असता त्या म्हणाले की, हे राज्याच्या गृहमंत्री यांचे फेल्युअर आहे. हे मी खूप दिवसांपासून सांगत आहे. देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण झाला आहे. आज देशात काय चालले आहे हे मणिपूर राज्यातील व्हिडिओच्या माध्यमातून पाहातच आहे. आज पूर्णपणे राज्याचे गृहमंत्री फेल झाले आहेत, असे यावेळी सुळे म्हणाल्या. काही दिवसांनी शरद पवार देखील मोदींसोबत येणार असल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, याबाबत मला काहीही माहीत नाही. लोकशाहीत त्यांना त्यांचे मत मांडायचा अधिकार आहे; पण एका गोष्टीचा आनंद वाटत की, केंद्रात इंडिया आणि राज्यात शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय विरोधकांना दिवस जात नाही, असेदेखील यावेळी सुळे म्हणाल्या.
तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्रम घ्यावा : 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाबद्दल सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, या सरकारने एक नवीन जुमला सुरू केला आहे. तो लोकांच्या पैशातून व्यासपीठाच्या नेत्यांना प्रमोट करण्यासाठी आहे. करोडो रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा तंत्रज्ञानाचा वापर करून घरोघरी 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम घेतला पाहिजे, असे देखील यावेळी सुळे म्हणाल्या. शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, त्या दोघांनीही याबाबत सांगितलं आहे. चोरडिया कुटुंबीयांशी आमच्या जन्माच्या आधीपासून संबंध आहे. त्यांच्या घरी जायला कोणाचीही परवानगी लागत नाही, असे देखील यावेळी सुळे म्हणाल्या.
राजकीय कारणासाठी भेटीला जात नाही: नवाब मलिक यांच्या बाबतीत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी कोणाच्याही भेटीला राजकीय कारणासाठी जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जो-जो जेलमध्ये गेला तेव्हा कुटुंब प्रमुख म्हणून मी त्यांच्या मदतीला गेली. मी कधीही जेलमध्ये जायला घाबरले नाही. मी त्या कुटुंबाबरोबर उभी राहिली. जेव्हा कोणी अडचणीत असतो तेव्हा त्यामागे उभं राहिलं पाहिजे, या मताची मी आहे. जेवढे प्रकरण झाले आहे ते राजकीय झाले आहे. नवाब मलिक यांच्या बाबतीत भाजपने काय काय नाही सांगितलं हे सर्वांनीच पाहिलं आहे, असे देखील यावेळी सुळे म्हणाल्या.
हेही वाचा:
- Rahul Gandhi On Pandit Neharu : नेहरु मेमोरियल म्युझियमचे नाव बदलल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
- Sharad Pawar Meeting In Beed: शरद पवारांच्या 'त्या' इशाऱ्याकडे अजित पवार गटाचे दुर्लक्ष, बीडमधील सभेची जय्यत तयारी
- Shinde Group vs BJP: भिंतीवर कमळ रेखाटले म्हणून, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण