पुणे : देशाच्या संसद भवनाचे उद्घाटन उद्या होत असून या उद्घाटनावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. सत्ताधारी भाजपाकडून काहीतरी चांगल्या गोष्टी घडत असताना विरोधकांनी विरोध करू नये अशी भूमिका घेतली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशाची संसद भवन चांगली वास्तू आहे. गेले कित्येक दिवस मी त्यामध्ये काम करत आहे. परंतु नवीन संसद भवन बांधायचे हे आम्हाला वर्तमानपत्रातून कळाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
विरोधकांना पाठिंबा : नवीन संसदेचा भूमिपूजन कार्यक्रमसुद्धा वर्तमानपत्रातून कळाला. आता उद्घाटनालासुद्धा विरोधकांना विश्वासात न घेता काम केले जात आहे. राष्ट्रपती नेहमी अभिभाषण करतात हा संसदेचा नियम आहे. त्यामुळे राष्ट्रपतींना बोलवावे अशी काही विरोधकांची भूमिका आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना विश्वासात न घेताच उद्घाटनाची तयारी केली आहे. त्यामुळे विरोधकांच्या भूमीकेला माझा पाठींबा असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.
आमदार अपात्रत्रेबाबत नंतर बोलणार : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना कोणाची याची तपासणी करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही शिवसेना पक्षाकडे तसेच निवडणूक आयोगाकडे घटना मागितली आहे. याचा अर्थ ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यावर मी प्रतिक्रिया देईन असे शरद पवार म्हणाले आहेत.
चर्चेला काही अर्थ नाही : केंद्र सरकार देशातील चार राज्यांमध्ये गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या ठिकाणी समान नागरी कायदा आणण्याची चर्चा करीत आहे. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, अशी चर्चा सरकार करीत आहे. परंतु मी तिथल्या काही सहकाऱ्यांशी बोललेलो आहे. तसा काही निर्णय झालेला नाही. त्यामुळे या चर्चेला काही अर्थ नाही, अशा चर्चा होत असतात असे देखील शरद पवार म्हणाले.
पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयमध्ये आज रयत शिक्षण संस्थेची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. तिला खासदार शरद पवार खासदार सुप्रिया सुळे अजित पवार दिलीप वळसे पाटील सुनिल तटकरे या सर्व शिक्षण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा -
New Parliament Building : अशी आहे संसदेची नवी इमारत! पहा Video