पुणे - महाविकास आघाडीच्या एक वर्षाच्या कामावर मतदारांनी शिक्का मारला असल्याची प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपाला धक्का दिला आहे. त्या पार्श्वभूमिवर ते बोलत होते.
नागपूरचा विजय मोठा
नागपूर पदवीधर मतदार संघात काँग्रेसने मिळवलेले यश मोठे आहे. हे महाविकास आघाडीचे यश आहे. नागपूर पदवीधर मतदार संघ आत्ता पर्यंत भाजपच्या मागे होता. मात्र यावेळी सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारले आहे असे पवार म्हणाले. आत्ता पर्यंत ज्यांना स्विकारले त्यांनाच मतदारांनी नाकारले असल्याचेही ते म्हणाले.
पुण्यातही मोठा विजय
पुणे पदविधर मतदार संघात मिळालेल्या विजया बद्दल पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या निवडणुकीत तो झाला असता मात्र पक्षात झालेल्या बंडखोरीमुळे तो मिळाला नाही. मात्र यावेळी तो विजय खेचून आणला असल्याचे ते म्हणाले. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे.
चंद्रकांत पाटलांना टोला
चंद्रकांत पाटलांना यावेळी पदवीधरमधून निवडून येणार नाही याचा विश्वास होता. त्यामुळेच त्यांनी ऐनवेळी कोथरूड या सोयीच्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती असे पवार म्हणाले. ते नेहमी विनोदी विधाने करत असतात त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले. वेगवेगळे लढा मग बघा असे वक्तव्य पाटील यांनी केले होते.
महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलतय, मविआला जनतेचा पाठींबा
या निकालामुळे राज्यातले चित्र बदलत आहे. महाविकास आघाडीला जनतेचा पाठींबा असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या एक वर्षात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाची ही पोचपावती असल्याचेही त्यांनी सांगितले.
नंदूरबारचा निकाल अपेक्षित
धुळे नंदूरबारचा निकाल हा अपेक्षितच होता. तो विजय विजय म्हणता येणार नाही. ती पोटनिवडणूक होती. शिवाय जे उमेदवार विजयी झाले आहेत त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळेच त्यांचा विजय झाला आहे.
हेही वाचा - भाजपचा गड ढासळला: पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय
हेही वाचा- मराठवाडा पदवीधर निवडणूक; महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांची हॅट्रिक